गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर वैजापूर रोडवरील जाखमाथा परिसरात सोमवारी सकाळी -झालेल्या भीषण अपघातात स्कुटीस्वाराचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर पल्सरस्वार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दीपक हरीभाऊ डोंगरे (वय ४०) हे सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास स्कुटीवरून गंगापूरहून वैजापूरच्या दिशेने जात होते. विठ्ठल आश्रमाजवळील जाखमाथा परिसरात त्यांच्या स्कुटीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या पल्सर दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दीपक डोंगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. डोंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तर, पल्सरस्वारावर गंगापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव करीत आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर :
युवक मृत दीपक हरीभाऊ डोंगरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, छोटे एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गंगापूर परिसरात शोककळा पसरली आहे.











